मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ९१ फूट उंचीच्या भव्य पुतळा उभारला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी तयार केलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा कांस्यापासून बनलेला आहे आणि ९१ फूट उंचीचा असून १० फूट उंचीचा पेडेस्ट्रॉल आहे. हा पुतळा कठोर हवामानाचा सामना करू शकतो आणि किमान १०० वर्षे टिकेल असे सांगण्यात आले आहे.
आयआयटी अभियंते, जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचं डिझाईन करण्यात आले आहे. कोकणात वेगवेगळ्या प्रकारचे तुफान आणि वादळे येतात. या सर्वांचा अभ्यास करून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर तौख्ते, फयान चक्रीवादळं आली त्याने प्रभावित न होता शिवरायांचा पुतळा तग धरू राहील, याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या वातावरणात पुतळा टिकू शकेल, याचा विचार करण्यात आला आहे. पुतळ्याच्या आसपासचा परिसरात आल्यानंतर शिवरायांच्या स्वराज्याचा अनुभव चांगल्या प्रकारने मिळण्याकरिता उपाययोजना करण्यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
फडणवीस यांनी सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देशातील सर्वात उंच पुतळा आहे. किमान १०० वर्ष हा पुतळा कुठल्याही वातावरणात टिकेल. ते म्हणाले, मागच्यावेळी दुर्देवी घटना झाली होती. त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी आम्ही पुन्हा प्रस्थापित करू. आज त्याचे पूजन आम्ही केले आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. दरम्यान, राजकोट येथील पुतळा कोसळ्याच्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि अजितदादांनी पुन्हा याच ठिकाणी पुतळा पुन्हा दिमाखात उभारण्याचा निर्धार केला होता. देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून आपण या पुतळ्याकडे पाहू शकतो असे फडणवीस यांनी सांगितले.
या भव्य लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, तसेच राज्य मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व नितेश राणे हेही उपस्थित होते.
पुतळ्याचे वैशिष्ट्य
- सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धकालीन मुद्रा असलेला, तलवारधारी 60 फूट उंच पुतळा आहे.
- तलवारीसह या भव्य पुतळ्याची एकूण उंची 83 फूट असून, तो 10 फूट उंच चबुतऱ्यावर उभारण्यात आला आहे. त्यामुळे जमीन पातळीपासून पुतळ्याची एकूण उंची 93 फूट इतकी आहे.
- या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी ब्राँझ धातूचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 88% तांबे, 4% जस्त आणि 8% कथिल यांचा समावेश आहे.
- पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे.
- पुतळ्याच्या मजबुतीसाठी ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क आणि SS 316 दर्जाचे गंजरोधक स्टील सळई वापरण्यात आल्या आहेत.
- चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे.
- फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे.
- ख्यातनाम व जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली असून, किमान 100 वर्षे टिकणारा असा हा शिल्पकृतीचा अद्वितीय नमुना आहे. याशिवाय पुढील 10 वर्षे या पुतळ्याच्या नियमित देखभाल व पर्यवेक्षणाची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे.