(रायगड)
वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजिटल अॅरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या अत्याधुनिक सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश रायगड सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक उघडकीस आली आहे. आरोपींनी टेलिकॉम कंपन्यांच्या SIP लाईन्सचा गैरवापर करत, बनावट कागदपत्रांद्वारे देशभरातील नागरिकांना फसवले होते. २३ मे २०२५ रोजी रायगड सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारदाराला ५ मे रोजी एका अज्ञात व्यक्तीने “टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया”तून बोलत असल्याचा बनाव करून ९ नंबर डायल करण्यास भाग पाडले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर स्वतःला “CBI अधिकारी” असल्याचे सांगून, तक्रारदारावर “मनी लॉन्डरिंग” प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. या खोट्या गुन्ह्यातून सुटका मिळवण्यासाठी १३ आणि २० मे रोजी तक्रारदाराला एकूण ६६ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये भरायला लावण्यात आले. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील एकूण ११ आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत: अब्दुस सलाम बारभुयान (आसाम) – बोगस कंपनीच्या माध्यमातून बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून इतर ठिकाणी वळवले, बिलाल फैजान अहमद (जौनपूर, उत्तर प्रदेश), नदीम अहमद, लैराब मोहम्मद रफीक खान, शादान खान, मोहम्मद फैसल खान (सर्व जण जौनपूर, उत्तर प्रदेश) – बनावट SIP लाईन्स मिळवण्यासाठी बनावट KYC व स्टॅम्प तयार करणारे, विनयकुमार राव व गंगाधर मुत्तन (हैदराबाद) – जिओ सेल्स मॅनेजर म्हणून बनावट कंपन्यांना SIP लाईन्स पुरवणारे, अभय संतप्रकाश मिश्रा (हरदोई, उत्तर प्रदेश) – मास्टरमाईंड, परदेशी नागरिकांशी संपर्क ठेवून SIP लाईन्सद्वारे आर्थिक फसवणूक, मोहसीन मिया खान (मुरादाबाद, उत्तर प्रदेश) – याच्याकडून 6175 SIM कार्ड्स जप्त, शम्स ताहिर खान (जयपूर, राजस्थान) – मार्केटिंग एजंट. पोलिसांनी या गुन्ह्यातून हस्तगत केलेली मालमत्ता पुढीलप्रमाणे आहे: 6175 SIM कार्ड्स, 35 मोबाईल फोन्स, डिजिटल उपकरणं – लॅपटॉप, VPN स्वीच, टॅब, आयपॅड, १२ बँक खाती गोठवण्यात आली असून ६६ लाख रुपये रोख देखील गोठवण्यात आले आहेत. शिवाय ८५ लाख रुपये मूल्याची बिटकॉइन संपत्ती, तसेच नेपाळमध्ये फ्लॅट, व्यावसायिक गाळे व बंगला जप्त करण्यात आला आहे.
रायगड सायबर पोलिसांनी जनतेस आवाहन केले आहे की, “डिजिटल अॅरेस्ट” ही कोणतीही वैध प्रक्रिया नाही. पोलिस, CBI किंवा ED यांसारख्या शासकीय संस्था कधीही व्हॉट्सअॅप, फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागत नाहीत किंवा तपास करत नाहीत. त्यामुळे कुठलाही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 / 14407 / 1945 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत माहिती द्यावी.