(मुंबई)
केंद्र सरकारच्या परीक्षा पे चर्चा २०२६ या उपक्रमासाठी राज्याला तब्बल ६५ लाख नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ २ लाख ७८ हजार ५३५ विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित अवघ्या १६ ते २० दिवसांत ६२ लाखांहून अधिक नोंदणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभाग आणि शिक्षकांसमोर उभे राहिले आहे.
परीक्षा पे चर्चा अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची एकूण ६५ लाख नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र अपेक्षित वेगाने नोंदणी न झाल्याने शिक्षण यंत्रणा दबावाखाली आली आहे.
केंद्र शासनाच्या परीक्षा पे चर्चा ९ या उपक्रमासाठी १ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत नोंदणी करायची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना अधिकृत संकेतस्थळ innovateindia.mygov.in वर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीमधून निवडक विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमधून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी थेट जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे ११ जानेवारी २०२६ पर्यंत ६२ लाखांहून अधिक नोंदणी पूर्ण करण्याचे मोठे लक्ष्य शिक्षण विभागासमोर आहे, आणि त्यासाठी केवळ २० दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे.
राज्यात उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची तयारी विभागाला करावी लागत आहे. मात्र ऐन परीक्षांच्या तोंडावर अभ्यासक्रम पूर्ण करणे, उपक्रमांचे अहवाल भरणे आणि सातत्याने ऑनलाइन माहिती अपलोड करणे या सगळ्यांमुळे शिक्षक अडचणीत सापडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षा पे चर्चा २०२६ नोंदणी मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी पुढील काही दिवस शिक्षण विभागासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

