(पुणे)
पुण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग पार्टी प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकर (रा. हडपसर, पुणे) यांच्या ताब्यातून आक्षेपार्ह व्हिडीओ, ड्रग्ज खरेदीसंदर्भातील चॅट्स आणि हॉटेल पार्टींचे धागेदोरे सापडले आहेत. दरम्यान, पाचही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ड्रग्ज आणि चॅट्स उघड
आरोपींच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम चॅट्समध्ये “माल चाहिये क्या?” असा संदेश आढळून आला असून, त्यावर “ठेऊन घ्या” असे उत्तर डॉ. प्रांजलने दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या संवादाचा संबंध ड्रग्जच्या व्यवहाराशी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. डॉ. प्रांजल यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व लॅपटॉपमध्ये महिलांसोबत रात्रीच्या पार्टीतील अशोभनीय आणि आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. हे व्हिडीओ आरोपीने गैरहेतूने काढले असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल, पेनड्राईव्ह आणि डिव्हीआरची सखोल तपासणी केली आहे. तपासात आरोपी एकमेकांशी मागील दोन वर्षांपासून सातत्याने संपर्कात असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
पोलिसांचा युक्तिवाद : महिलेचा व्हिडीओ, आक्षेपार्ह मेसेज आणि पुरावे
तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले की, खेवलकर याने एका महिलेचा नाचताना दिसणारा व्हिडीओ एका सहआरोपीला पाठवला आणि त्याचबरोबर ‘ऐसा माल चाहीए’ असा मेसेजही केला होता. संबंधित महिला आरोपीसह खेवलकर हे गेल्या दोन वर्षांपासून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. ड्रग्सचा पुरवठा कोठून झाला, याबाबत आरोपींनी अजून माहिती दिली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये २ लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, डिव्हीआर कॅसेट आणि कॅमेरा यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचे फॉरेन्सिक विश्लेषण केल्यावर अनेक महत्त्वपूर्ण डेटा हाती लागले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपी विविध शहरांतील मोठ्या हॉटेलांमध्ये महिलांसोबत पार्टी करत असत. जप्त फोटो आणि चॅट्सच्या आधारे इतर संभाव्य आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
सर्व पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे आणि श्रीपाद यादव या आरोपींसाठी अधिक ३ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.