(नाशिक)
नाशिक पोलिसांनी तब्बल 30 किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करत दोन सराईत तोतया पोलिसांना अटक केली असून या कारवाईत 58 गुन्ह्यांचा मोठा पर्दाफाश झाला आहे. आरोपींकडून सुमारे 30 लाख रुपये किमतीचे 201 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
राज्यासह नाशिकमध्ये पोलीस असल्याचे भासवत लूट करणाऱ्या घटनांमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झाली होती. एकट्या नाशिक शहरात अशा 42 घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल 900 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासातून संशयित आरोपींचे चेहरे आणि त्यांची दुचाकी ओळखण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमद अली अकबर अली बेग आणि फैयाज इम्तियाज अन्सारी (रा. भिवंडी, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसांची नावे आहेत. पाथर्डी फाटा परिसरात सिग्नलवर हे दोघे उभे असल्याचे अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला आणि तब्बल 30 किलोमीटरच्या थरारानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
तपासात या टोळीने 2023 ते 2026 या कालावधीत नाशिक शहरात 42, नाशिक ग्रामीण भागात 10, धुळे जिल्ह्यात 5 आणि कर्नाटकमध्ये 1 असे एकूण 58 गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. तसेच 29 जून 2024 रोजी कर्नाटकमधील बेटगिरी गडक येथे एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर आहे, त्यामुळे कर्नाटक पोलीसही त्यांच्या मागावर होते.
या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, या सिंडिकेटमधील गुन्हेगार लहान वयात सोनसाखळी लूट करत आणि वय 30 ते 45 दरम्यान पोहोचल्यावर तोतया पोलीस बनून फसवणूक करायचे. मराठी शाळांमधून शिक्षण घेऊन अस्सल मराठी बोलण्याचा सराव, पोलीस हेअरकट, देहबोली आणि वागणूक यांचे प्रशिक्षण त्यांना लहानपणापासूनच दिले जात होते. या यशस्वी कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत असून नागरिकांनीही पोलीस असल्याचे भासवणाऱ्या अनोळखी व्यक्तींविषयी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

