(मुंबई)
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना त्या दिवशी सुटी किंवा आवश्यक सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकानुसार, ज्या मतदान क्षेत्रात निवडणूक होत आहे त्या भागातील मतदार असलेले कामगार, अधिकारी आणि कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देणे आवश्यक आहे. हा आदेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आणि उद्योगांना लागू राहणार आहे.
यामध्ये खासगी कंपन्या, आस्थापना, सर्व प्रकारची दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी व औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे. संबंधित आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी आवश्यक वेळ किंवा पूर्ण दिवसाची भरपगारी सुटी देणे बंधनकारक असेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सार्वजनिक सुटी लागू असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील सर्व संबंधित पंचायत समित्यांमध्ये मतदानाच्या दिवशी सुटी राहणार आहे.
निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मतदारांचा सहभाग वाढण्याची शक्यता असून, कामाच्या कारणामुळे मतदानापासून वंचित राहणाऱ्या मतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

