(मुंबई)
गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल होते. त्यासोबत रस्ते मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणे हे दरवर्षीच एक आव्हान असते. पावसाळ्यात खराब झालेले रस्ते, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, अपघाताची भीती आणि कासवगतीने होणारी वाहतूक यामुळे प्रवास कंटाळवाणा ठरतो. अनेकजण या त्रासापासून वाचण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. पण मग त्यांना खासगी वाहनाशिवाय कोकणात पोहोचावे लागते. आता मात्र कोकण रेल्वेने यावर एक अभिनव उपाय शोधला आहे. ‘रो-रो’ सेवेमुळे तुम्हाला तुमच्या खासगी गाडीसोबतच प्रवास करता येणार आहे.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने यंदा एक खास भेट आणली आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील प्रवासाची दगदग यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि अनोखी ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ (Ro-Ro) सेवा दिली जाणार आहे.
कोकण रेल्वे महामंडळाने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दरम्यान सुरू केलेल्या रो-रो (Ro-Ro) कार ट्रान्सपोर्टेशन सेवेला आता नवा थांबा मिळाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी “नांदगाव रोड” स्थानकावर या सेवेसाठी अतिरिक्त थांबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कार मालकांसाठी ही सेवा अधिक लवचिक, सुलभ आणि वापरकर्ता-अनुकूल ठरणार आहे. आता प्रवासी कोलाड, नांदगाव रोड किंवा वेर्णा या कोणत्याही स्थानकावरून आपली कार लोड किंवा अनलोड करू शकतात. कोकण किनारपट्टीवरील प्रवाशांसाठी अधिक सुविधा आणि सहज प्रवासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
या सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोलाड ते वेर्णा दरम्यान एका कारसाठी भाडे ₹७८७५/- (५% GST सहित) इतके आहे, तर कोलाड ते नांदगाव रोड दरम्यानचे भाडे ₹५४६०/- आहे. प्रत्येक कारसाठी ₹४०००/- नोंदणी शुल्क आकारले जाईल. हे शुल्क सेवा निश्चित झाल्यास अंतिम भाड्यातून वजा केले जाईल. मात्र, जर किमान १६ बुकिंग्स प्राप्त झाल्या नाहीत, तर ही सेवा रद्द करण्यात येईल आणि नोंदणी शुल्क परत केले जाईल.
सेवेच्या दरम्यान चालक किंवा सहप्रवाशांना कारमध्ये बसून प्रवास करण्यास परवानगी नाही. त्याऐवजी संबंधित प्रवाशांनी रेल्वेच्या कोचमध्ये प्रवासासाठी स्वतंत्र तिकिट काढणे आवश्यक आहे. एका कार बुकिंगवर ३ प्रवासी प्रवास करू शकतात, यामध्ये २ प्रवासी 3AC वर्गात आणि १ प्रवासी 2S वर्गात प्रवास करू शकतो. अतिरिक्त प्रवाशांना केवळ रिक्त जागा उपलब्ध असल्यासच प्रवासाची परवानगी दिली जाईल.
नांदगाव रोड स्थानकाच्या समावेशामुळे वेळापत्रकातही आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. कोलाडहून वेर्णाकडे जाणारी सेवा दुपारी ३ वाजता सुरू होईल, रात्री १० वाजता नांदगाव रोड स्थानकावर पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा स्थानकात पोहोचेल. वेर्णाहून परतीच्या प्रवासात गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, नांदगावला रात्री ८ वाजता पोहोचेल आणि कोलाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल.
या रो रो सेवेतंर्गत मालवाहू ट्रकप्रमाणे तुम्हाला तुमची कार नेण्याची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे वेळ, पैशाची बचत होणार आहे. तसेच वाहतूक कोंडी किंवा खराब रस्त्यांपासूनही तुमची सुटका होणार आहे. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या रो-रो सेवेमुळे तुम्हाला तुमचे वाहन थेट रेल्वेच्या डब्यात ठेवून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आरामात रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
नोंदणीसाठी प्रवाशांनी कोलाड, वेर्णा किंवा कणकवली (नांदगावसाठी) स्थानकावर संपर्क साधावा. तसेच अधिक माहिती, नियम व अटी जाणून घेण्यासाठी कोकण रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com यावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.