(रत्नागिरी)
रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील भूगोल विषयाअंतर्गत वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. ३१ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी येथील हवामान वेधशाळेस शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या अभ्यासभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हवामान निरीक्षणाची माहिती देणे, हवामान मोजणारी विविध यंत्रे पाहणे तसेच हवामान अंदाज कसा तयार केला जातो हे समजावून घेणे हा होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना हवामान वेधशाळेतील विविध उपकरणांची माहिती आणि हवामान मोजण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली. तापमापक, आर्द्रतामापक, पर्जन्यमापक, वाऱ्याचा वेग व दिशामापक यांसारख्या उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पायलट बलून ऑब्झर्वेटरी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर. बी. सोनार, वैज्ञानिक सहाय्यक श्री. अनिलकुमार सिंह, श्री. सुमित खटावकर व श्री. अभिनव कुमार या तज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. त्यांनी हवामान अंदाज कसा तयार होतो, ढगांची निर्मिती व प्रकार, ढगफुटी यासंबंधी सविस्तर माहिती दिली. तसेच बलूनच्या सहाय्याने हवामान निरीक्षण कसे केले जाते व त्याची सांख्यिकीय नोंद आलेखाद्वारे कशी केली जाते, याचे स्पष्टीकरण श्री. सोनार यांनी केले.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना हवामानशास्त्राबाबत प्रत्यक्ष अनुभव घेता आला व त्यांच्या अभ्यासाविषयीची उत्सुकता अधिक वृद्धिंगत झाली. या भेटीत मंडळाच्या २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर आणि कला विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट यशस्वीपणे पार पडली.
सदर कार्यक्रमास वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय माळवदे तसेच सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. सुनील भोईर आणि प्रा. योगिता गायकवाड उपस्थित होते.