(खेड/ रत्नागिरी)
खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील या दरडीमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, सध्या ती एका लेनवर वळवण्यात आली आहे. दरड कोसळल्यानंतर महामार्गावर माती, दगड साचल्याने वाहनांची संथगतीने वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड हटवण्यात आणखी काही तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे कोकणात डोंगर उतारांवर दरड कोसळण्याचे प्रकार वाढले असून, महामार्गावरील सुरक्षिततेबाबत वाहनचालक व प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.