( रत्नागिरी/प्रतिनिधी )
आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीत भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले. बौद्ध अनुयायी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बोधीसत्व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांना पुन्हा एकदा वंदन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा पदाधिकारी प्रदीप जाधव, विजय जाधव, जनार्दन मोहिते, विजय कांबळे, तानाजी कांबळे, सुनील पवार व रविचंद्र कांबळे उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांनी दिलेला संविधानिक मार्ग, मानवी हक्कांची भक्कम भूमिका आणि बुद्धांच्या करुणामय विचारधारेची आजच्या काळातील उपयुक्तता याविषयी पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित हा अभिवादन कार्यक्रम संयत, भावपूर्ण वातावरणात पार पडला. बौद्ध महासभेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची ज्योत कायम प्रज्वलित ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

