(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मोसमी पाऊस यंदा अपेक्षेपेक्षा अधिक काळ लांबल्याने डिसेंबरमध्ये अंडी घालण्यासाठी किनाऱ्यांवर दाखल होणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संख्येत घट झाल्याची शक्यता कासव अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी डिसेंबरपासून कासवांचे आगमन सुरू होते; मात्र यंदा हे चित्र काहीसे बदललेले दिसून येत आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेत वन विभाग आणि कांदळवन कक्षामार्फत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कासव संवर्धन चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. पूर्वी या कासवांच्या अंड्यांची तस्करी होत असे, तर काही ठिकाणी वन्यप्राणी अंडी खाद्य म्हणून फस्त करत असत. हे प्रकार रोखण्यासाठी समुद्रकिनारी असलेल्या गावांतील नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले असून, कासव संवर्धनाची जबाबदारी स्थानिक ग्रामस्थांवर सोपवण्यात आली आहे.
या जनसहभागाच्या उपक्रमामुळे गेल्या २० वर्षांत कोकण किनारपट्टीवरील तब्बल ३४ किनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम नियमितपणे सुरू आहे. कासवमित्रांच्या सतर्कतेमुळे अनेक घरटी सुरक्षित करण्यात यश आले आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले कासवघरटे गुहागर किनाऱ्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आढळून आले. तेथील कासवमित्रांनी तत्काळ उपाययोजना करून अंडी सुरक्षित केली. आतापर्यंत जिल्ह्यातील सात किनाऱ्यांवर कासवांनी अंडी घातल्याची नोंद झाली असली, तरी मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.
हवामानातील बदल, पावसाचा वाढलेला कालावधी आणि समुद्रातील परिस्थिती यांचा कासवांच्या स्थलांतरावर परिणाम होत असल्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करीत आहेत. आगामी काळात कासव संवर्धनासाठी अधिक दक्षता आणि सातत्य राखण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

