(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कासे गुरववाडी येथील ८५ वर्षीय शांताराम भागा गुरव हे २४ जुलै रोजी घरातील सदस्यांना कोणतीही कल्पना न देता घरातून निघून गेले असून ते अद्याप परत आलेले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात त्यांचा सर्वतोपरी शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही. यामुळे त्यांचा मुलगा राजेश गुरव यांनी २८ जुलै रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी नापत्ता रजिस्टर क्र. २४/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शांताराम गुरव यांचे गेले वर्षभर मानसिक संतुलन बिघडलेले असून, २४ जुलै रोजी सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत ते राहत्या घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी अंगामध्ये भगव्या रंगाचा हाफ टी-शर्ट व जांभळ्या रंगाची नाड्याची चड्डी घातलेली होती. त्यांची उंची ५ फूट ९ इंच, अंगकाठी सडपातळ, चेहरा उभट, रंग सावळा, केस पांढरे व मिशा तलवारकट आहेत.
नातेवाईक व ग्रामस्थांनी परिसरात शोध घेऊनही त्यांचा तपास न लागल्याने पोलिसांना खबर देण्यात आली आहे. संगमेश्वर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दिलेल्या वर्णनाची व्यक्ती कोठेही दिसल्यास त्वरित संगमेश्वर पोलीस ठाणे किंवा माखजन पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधावा.