(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मानवी तस्करीविरोधी जागतिक दिनानिमित्त ‘Access to Justice for Children’ या प्रकल्पाच्या अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालहक्क संरक्षण व बालकांविरोधातील गुन्ह्यांविषयी समाजात संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘भाकर सेवा संस्थे’च्या कला पथकाने सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांना अस्वस्थ करून अंतर्मुख केले.
या पथनाट्यात बालतस्करी, बालविवाह, बालकामगार, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच बालकांचे कायदे व हक्क याविषयी प्रभावी संदेश दिला गेला. घोषवाक्ये, भित्तीपत्रके व बालहक्कांविषयी माहितीपर पत्रकांचे वितरण करत उपस्थित नागरिकांना 1098 या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास रत्नागिरी रेल्वे स्थानक प्रमुख एम. एन. रॉय, RPF इन्स्पेक्टर सतीश विधाते, वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक पेडणेकर, सहाय्यक सुरक्षा आयुक्त गोकुळ सोनोने, सहाय्यक उपनिरीक्षक चौहान, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्रप्रशासक अश्विनी मोरे, जिल्हा समन्वयक पवनकुमार मोरे, तालुका समन्वयक मधुरा दळवी, निकिता कांबळे, कोमल सोलीम, तसेच भाकर सेवा संस्थेच्या कार्यकर्त्या शीतल धनावडे, पूर्वा सावंत, स्मिता पिलणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी रेल्वे पोलिस विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीसह भावनिक संबंध निर्माण करून सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणण्यात या कार्यक्रमास यश लाभले.