(पुणे)
शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट अॅप तयार करून झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू केली असून, या रकमेचा पुढचा प्रवास नेमका कुठे गेला याचा शोध घेतला जात आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून देवस्थानच्या नावाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी सायबर विभागाच्या प्राथमिक चौकशीनंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात पूजा परिसेवा डॉट कॉम, नवग्रह मंदिर डॉट कॉम, ऑनलाइन प्रसाद डॉट कॉम, हरी ओम अॅप आणि इपूजा डॉट कॉम या पाच बनावट अॅप्सवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिस आता देवस्थानच्या अधिकृत अॅपचीही तपासणी करत आहेत. अधिकृत अॅपच्या माध्यमातूनच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले होते का, याचा शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान आणखी काही बनावट अॅप्स उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.