(पुणे)
पुण्यातील ड्रग्ज रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसेंचे जावई प्राजंल खेवलकर आता आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पोलिसांनी खेवलकरच्या मोबाईलमधून सापडलेल्या व्हिडीओ क्लिप्सपैकी चार मुली ओळखून काढल्या असून, त्या मुली सध्या पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या मुलींनी जर तक्रार दाखल केली, तर प्राजंल खेवलकरविरोधात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्याची कोठडीतून सुटका होणे कठीण होऊ शकते.
252 अश्लील व्हिडीओ सापडल्याचा आरोप
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्राजंल खेवलकरच्या मोबाईलमध्ये 252 अश्लील व्हिडीओ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्हिडीओंच्या आधारे शेकडो तरुणींविरोधात लैंगिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे. खेवलकरच्या मोबाईलमधील व्हिडीओंची चौकशी अधिक सखोल झाली, तर मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या लैंगिक शोषण रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण गंभीर वळण घेण्याची चिन्हं आहेत
एकनाथ खडसेंचा प्रत्युत्तर
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, प्राजंल खेवलकरच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार रूपाली चाकणकर यांना नाही. तसेच कोणत्याही तरुणीने अधिकृत तक्रार दिल्यासच पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
.

