(रायगड)
जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील सहा महिन्यांमध्ये तब्बल ऐंशीहून अधिक अपघात झाले असून या अपघातांमध्ये पस्तीस निरपराध नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ही मालिका अद्याप थांबलेली नसून माणगाव तालुक्यातील रातवड गावाजवळ आणखी एक गंभीर अपघात घडला आहे.
श्रीवर्धन येथून मुंबईच्या दिशेने निघालेली एस.टी. बस नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाली असून या अपघातात चालकासह सात प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी अधिकृत माहिती अशी की ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारात कार्यरत असलेले चालक सिद्धेश्वर विश्वनाथ भैरट (वय ४१, मूळ राहणार येवता, तालुका केज, जिल्हा बीड, सध्या राहणार वडघर, भिवंडी, ठाणे) हे बस क्रमांक एमएच-२० बीएल-३६२० घेऊन श्रीवर्धन येथून मुंबईकडे जात होते. दिनांक २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास ही बस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना माणगाव तालुक्यातील रातवड गावाच्या हद्दीत पोहोचली. त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून डाव्या बाजूने अत्यंत बेदरकारपणे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कच्च्या रस्त्यावर जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली.
या अपघातात माया सुनील जाधव (वय ५५, रा. डोंबिवली, मूळ रा. कालिंदे-तळा), रोहितकुमार रामनाथ पांडे (वय ३०, सध्या रा. कृष्णानगर, रोहा; मूळ रा. बिहार), चालक सिद्धेश्वर विश्वनाथ भैरट (वय ४१), मयुरेश महेश जाधव (वय ३, रा. गारभट आदिवासी वाडी, ता. रोहा), निकिता जितेंद्र पवार (वय ३०, रा. वडाळा, मुंबई; मूळ रा. चोचीदे, महाड), जितेंद्र संजय पवार (वय ३५, रा. वडाळा, मुंबई; मूळ रा. चोचीदे, महाड) आणि जिनल जितेंद्र पवार (वय ९, रा. वडाळा, मुंबई; मूळ रा. चोचीदे, महाड) हे प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकाविरोधात महेश मारुती जाधव (वय २४, व्यवसाय मजुरी, रा. गारभट आदिवासी वाडी, पो. गारभट, ता. रोहा, जि. रायगड) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून रात्री उशिरा या अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत.