(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत नागपंचमीच्या (२९ जुलै २०२५) निमित्ताने केळशी जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक १ येथे इंद्रधनू गटाच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, शेतीमध्ये सापांचे महत्त्व पटवून देणे तसेच अंधश्रद्धा आणि गैरसमजुती दूर करणे हा होता.
विद्यार्थिनींनी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून आकर्षक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर केले, ज्यामध्ये शेती व निसर्गात सापांचे महत्त्व, घरात साप आल्यास काय करावे, सर्पदंश झाल्यास तातडीची उपाययोजना आणि त्याची लक्षणे, महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख सापांची माहिती व चित्रे तसेच सापांविषयी असलेल्या अंधश्रद्धा आणि सामान्य गैरसमजुतींची परिपूर्ण माहिती देण्यात आली. या विद्यार्थिनींच्या सादरीकरणाला उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे त्यांच्या मनातील भीती कमी होऊन वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

