( चिपळूण )
चिपळूण शहरातील गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून आज दुपारी एका तरुण विवाहित दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, एनडीआरएफच्या जवानांकडून नदीत कसून शोधकार्य सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्याचे नावे अश्विनी निलेश आहिरे (१९) व निलेश रामदास आहिरे (२६) अशी असून, ते मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेलं हे दाम्पत्य सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथे भाड्याने राहत होते. बुधवारी दुपारी त्यांनी गंधारेश्वर ब्रिजवर आपली मोटरसायकल उभी करून नदीत उडी मारली. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक व वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, व तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) ला पाचारण करण्यात आले असून त्यांचे जवान नदीत कसोशीने शोधकार्य करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती पसरताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी नियंत्रण मिळवत नदीकाठ सील केला. अद्यापपर्यंत शोधकार्य सुरू असून दाम्पत्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी व निलेश यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच झाले होते. आत्महत्येपूर्वी काही वाद किंवा अन्य कारण होते का, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. या घटनेने चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीय व नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

