(संगमेश्वर / एजाज पटेल)
मृग नक्षत्राच्या सरी कोसळू लागल्या की कोकणातील रानपरिसर एका वेगळ्याच चैतन्याने बहरून जातो. पावसाच्या पहिल्या सरींनंतर निसर्गाच्या कुशीत उगवणाऱ्या गावरान अळंबी (कळंब) या दुर्मिळ रानमेव्याच्या शोधासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेपासूनच जंगलाच्या वाटा धरू लागले आहेत. वर्षातून अवघ्या काही दिवसांसाठी उपलब्ध होणाऱ्या या नैसर्गिक खाद्यपदार्थामुळे सध्या अवघड रानवाटा गजबजून गेल्या आहेत.
कोकणात पावसाळ्यात अळंबीला विशेष महत्त्व आहे. साधारणतः श्रावण महिन्यातील पुष्य नक्षत्राच्या सुमारास जंगल परिसर, मोकळी राने, पालापाचोळा आणि वारुळांच्या परिसरात पांढऱ्याशुभ्र अळंबी नैसर्गिकरीत्या उगवतात. कोणत्याही प्रकारची लागवड किंवा खतांशिवाय वाढणाऱ्या या अळंबीची चव आणि पौष्टिकता यामुळे ती गावरान खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग मानली जाते.
मात्र अळंबी गोळा करताना मोठी दक्षता घ्यावी लागते. खाण्यायोग्य पांढऱ्या अळंबीसोबतच पिवळसर, काळसर किंवा ओंडक्यांवर उगवणाऱ्या काही विषारी जातीही आढळतात. त्यामुळे अनुभवी आणि जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच अळंबी गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. विषारी अळंबीचे सेवन आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते.
पहाटेच्या रानभटकंतीचा वेगळाच आनंद
पहाटेच्या थंडगार वातावरणात, ओल्या मातीचा दरवळ, झाडाझुडपांमधून डोकावणारी पांढरीशुभ्र अळंबी आणि तिचा शोध घेत रानावनात भटकण्याचा अनुभव अनेकांसाठी अविस्मरणीय ठरतो. हातात टोपली किंवा पिशवी घेऊन ग्रामस्थ जंगलात फिरताना एखाद्या ठिकाणी अळंबीचा समूह सापडला की त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही.
चवीसोबतच आरोग्याचाही खजिना
अळंबी केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि विविध खनिजांनी समृद्ध असलेली अळंबी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. रक्तातील आवश्यक घटकांचे संतुलन राखण्यासही ती उपयुक्त मानली जाते. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असणारे आणि अस्सल गावरान चवीचे चाहते या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात.
वारुळावर उगवलेली अळंबी वारुळातील नाग खातो असा गैरसमज आहे. मात्र नाग अशी अळंबी कधीही खात नाही. एकदा उगवण्यास सुरुवात झालेली अळंबी आठवडाभर उगवत राहतात. सकाळी लवकर व संध्याकाळी ही अळंबी उगवतात. अळंबी शोधण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी रानात जावे लागते. उगवलेली अळंबी दिवसभर तशीच राहिली तर पाऊस पडल्याने खराब होतात. याशिवाय बारीक काळे भुंगे अशी अळंबी पोखरतात. अळंबी मातीतून उगवत असल्याने त्यांना माती लागलेली असते. सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळंबी नंतर पूर्ण उमलल्यावर छत्रीसारखी दिसतात. घरी आणलेली अळंबी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर कापून त्याच्या फोडी करतात. कांदापातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळंबीभाजी करतात. अळंबी भाजीत खाज नसली तरी शिजवताना कोकम टाकण्याची पद्धत आहे. तर लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबीची भाजी अधिक रुचकर लागते.
चुलीवरील अळंबीच्या कालवणाची खास चव
रानातून आणलेली अळंबी स्वच्छ धुवून तिची भाजी किंवा लालसर झणझणीत कालवण तयार केले जाते. पारंपरिक पद्धतीने कोकम घालून आणि लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबी अधिक रुचकर लागते, असे जाणकार सांगतात. गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अळंबीचा आस्वाद घेताना मिळणारी तृप्ती हीच कोकणातील पावसाळ्याची खरी मेजवानी मानली जाते.
वर्षातून केवळ काही दिवसांसाठी मिळणाऱ्या या नैसर्गिक रानमेव्यामुळे सध्या कोकणातील ग्रामीण भागात आनंदाचे आणि चवीचे वातावरण निर्माण झाले असून, निसर्गाशी असलेले माणसाचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

