(चिपळूण)
कोणताही विशेष क्लास नाही, ना कोट्यवधींचं मार्गदर्शन… तरीही केवळ आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर चिपळूणच्या डॉ. भक्ती पवार यांनी औषध निर्माण शास्त्रातील देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असलेल्या नायपर, अहमदाबाद (NIPER) येथून पीएच.डी. मिळवली आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी आठवा क्रमांक पटकावला असून, त्यांच्या या यशामुळे चिपळूण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची लहर उसळली आहे.
डॉ. भक्ती पवार या युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी फार्मास्युटिक्स या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाचा गौरव भाजप चिपळूण शहर मंडळातर्फे त्यांच्या राहत्या घरी करण्यात आला. या प्रसंगी परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका व भाजपच्या माजी शहराध्यक्ष सौ. वैशाली निमकर म्हणाल्या, “खास क्लासेस नसतानाही भक्तीने मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं. तिच्या जिद्दीला वंदन करावं असं हे उदाहरण आहे.”
या सत्कार कार्यक्रमाला शहराध्यक्ष शशिकांत मोदी, विजय चितळे, अर्बन बँकेच्या संचालिका दीपा देवळेकर, सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर, अश्विनी वरवडेकर, विनायक वरवडेकर, निनाद आवटे, अभिजीत सावर्डेकर, महेंद्र पवार, विमल लढ्ढा, मानसी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भक्ती पवार यांचे यश चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, चिकाटी आणि स्वकष्टावर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिलं आहे.