(चिपळूण / प्रतिनिधी)
शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि एसटी प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाबाबत चिपळूणचे तरुण, तडफदार नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी त्यांनी ठाणे येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. परिवहन मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन त्यानंतर स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्याचे व लागेल तितका निधी बस स्थानकाच्या कामासाठी देण्याची ग्वाही या वेळी दिली.
शुक्रवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहरातील हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी ठेकेदार तेजस शिंदे यांच्याकडून कामाची सविस्तर वस्तुस्थिती जाणून घेतली. यापूर्वीच १५ जानेवारीनंतर आपण परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना चिपळूण येथे घेऊन येऊ, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते.
पाहणीनंतर तातडीने दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ ठाणे येथे पोहोचले. तेथे त्यांनी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रकल्पासंदर्भातील सविस्तर माहिती त्यांच्यासमोर मांडली.
यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले की, या प्रकल्पाचे मूळ अंदाजपत्रक सन २०१६ मध्ये तयार करण्यात आले होते. कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ₹५.८५ कोटींची मंजुरी देण्यात आली होती. मात्र निधी कपातीमुळे प्रकल्पाचा खर्च कमी करण्यात आला असून, सद्यस्थितीत हे काम ₹२.८७ कोटी रुपयांत पूर्ण केले जात आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रकल्पातील अडचणी, निधी कपातीमुळे आलेल्या मर्यादा तसेच उर्वरित कामासाठी आवश्यक निधीची बाब सविस्तरपणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकून घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ जानेवारीनंतर मंत्रालयात परिवहन विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे जाहीर केले. तसेच या बैठकीनंतर स्वतः चिपळूण येथे येऊन हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात निधीची कपात करण्यात आली होती, मात्र उर्वरित निधी व आवश्यक तेवढा अतिरिक्त निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे ठोस आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना दिले.
चिपळूण शहरासाठी, तालुक्यासाठी आणि विशेषतः एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रश्न नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी गांभीर्याने हाती घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

