(चिपळूण)
चिपळूण शहरात उच्चशिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय युवकाने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव ओवेस जुलफीकार मुल्ला असे असून तो फार्मसीचे शिक्षण घेत होता. आत्महत्येमागील नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. हे कुटुंब वाणी आळीतील एकता अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ओवेस शौचालयात गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. अखेर घरच्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता, लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
याबाबतची माहिती तात्काळ चिपळूण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासानंतर ही घटना आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत.
शहरातील सुशिक्षित व प्रतिष्ठित कुटुंबातील ओवेसच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.