(चिपळूण)
मुंबई–गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते फाटा येथे भरधाव वाहनाने पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काळ्या रंगाच्या हुंडाई क्रेटा कारने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने कोणतीही मदत न करता गाडीसह घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. फिर्यादी अब्दुल रऊफ कुदबुद्दीन शेख यांचे चुलत भाऊ निजामुद्दीन हसनअली शेख (वय ३६, रा. निरबाडे मोहल्ला, चिपळूण) हे कळंबस्ते फाटा परिसरात रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून गोव्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार अत्यंत निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत निजामुद्दीन शेख यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी संबंधित चालकाने घटनास्थळावरून वेगाने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या प्रकरणी अब्दुल रऊफ शेख (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात क्रेटा कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोंद शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३४ वाजता करण्यात आली. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८४, १३४ (अ) व (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अपघातातील कारचा क्रमांक अद्याप अज्ञात असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित काळ्या रंगाच्या क्रेटा कारचा व चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

