(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. अणुस्कुरा चेक पोस्ट येथे मंगळवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या दरम्यान रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ९५ बॉक्स जप्त केले.
या कारवाईत सुमारे ६३ हजार ६५० रुपयांची दारू व सुमारे तीन लाख रुपयांचे वाहन मिळून एकूण ३ लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अणुस्कुरा घाटातील चेकपोस्टवर नाकाबंदी सुरू असताना एमएच-०७ एजे-३७३९ क्रमांकाची टाटा इंट्रा गाडी आल्याने पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात गोवा बनावटीची दारू लपवून ठेवलेले ९५ बॉक्स आढळून आले. ही कारवाई ए.एस.आय. कमलाकर पाटील, पोलीस शिपाई बळीप, व पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील यांनी केली.
मागील काही महिन्यांत राजापूर तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी अनेक धडक कारवाया केल्या आहेत. यापूर्वी राजापूर एस.टी.आगारासमोर व इतर भागांत लाखो रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली होती. अणुस्कुरा घाटातील ही कारवाई त्या मोहिमेतील आणखी एक यशस्वी कामगिरी ठरली आहे.
सदर प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.