(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील वारकरी भक्तीपरंपरेला उजाळा देणारा आणि वारकरी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक ठरलेला मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर पायी दिंडी सोहळा श्रावण शुद्ध चतुर्थी, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी अत्यंत भक्तिभावात आणि टाळमृदंगाच्या गजरात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याचे आयोजन श्रीमद् भागवत नाम संप्रदाय मंडळ, मुरादपूर व संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
श्री राधाकृष्ण मंदिर, मुरादपूर येथून पहाटेच्या मुहूर्तावर या पायी दिंडीचा श्रींच्या नामस्मरणात आणि अभंगवाणीच्या गजरात शुभारंभ झाला. स्त्री-पुरुष, लहानथोर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. संपूर्ण मार्गभर दिंडीतील वारकरी ‘माऊली माऊली’च्या गजरात पुढे पुढे सरकत होते. हातात भगवे पताके, टाळ मृदुंग, केशरी फेटे, निंबाच्या पालख्या आणि भक्तिगीतांनी संपूर्ण मार्ग हरिनाममय झाला होता.
या पायी तिर्थयात्रेचे प्रेरणास्थान ह.भ.प. वैकुंठवासी तुकाराम महाराज काजवे यांचे आध्यात्मिक कार्य असून, त्यांच्या सेवाकार्यातून या दिंडीची अखंड परंपरा सुरू आहे. यंदाच्या दिंडी समितीत तालुका अध्यक्ष ह.भ.प. रमेश महाराज बांडागळे (मुरादपूर), ह.भ.प. संजय महाराज कानाल (चिखली) हे उपक्रमप्रमुख, ह.भ.प. सुनिल महाराज करंडे गुरुजी (माळवाशी) हे खजिनदार व ह.भ.प. नंदकुमार महाराज लिंगायत (तुरळ) हे यांच्यासह शेकडो भाविक सहभागी झाले होते.
मार्गातील विविध गावांतून ग्रामस्थांनी जलपान, फराळ, फळे व पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले. काही ठिकाणी दिंडीसाठी रांगोळ्यांचे सुंदर देखावे, पालख्यांसाठी तोरणे आणि मार्गावर हरिपाठाचे आयोजनही करण्यात आले होते. या यात्रेची सांगता श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे हरिपाठ, भजन, आरती आणि महाप्रसादाने झाली. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यावर हजारो भाविकांची उपस्थिती होती.
संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालं होतं. हा दिंडी सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून, वारकरी संप्रदायाच्या एकात्मतेचे, सेवाभावाचे, श्रद्धेचे आणि ग्रामीण महाराष्ट्रातील अध्यात्मिक समरसतेचे प्रतीक आहे. या भक्तिसंचित सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी भाविकांचे आणि सेवा करणाऱ्या ग्रामस्थांचे आयोजक मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.