(संगमेश्वर)
तालुक्यातील बावनदी येथून एक युनिकॉर्न मोटरसायकल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्याच्या कडेला किराणा दुकानासमोर उभी असलेली ही दुचाकी अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद रत्नागिरीच्या जाकीमि-या येथील शुभम सुनिल शिवलकर (वय २९) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली.
चोरीस गेलेली दुचाकी ग्रे रंगाची, होंडा युनिकॉर्न (क्र. MH-08 AW-7501) असून, तिची अंदाजित किंमत सुमारे ५० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शुभम शिवलकर यांनी आपल्या वडिलांच्या नावे असलेली दुचाकी त्यांचा मित्र आयष समीर सावंत याला काही कामासाठी देवरुख येथे जाण्यासाठी दिली होती. काम आटोपून परत येताना दुचाकीची साखळी (चेन) तुटल्याने सावंत याने ती बावनदीजवळील किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली. त्यानंतर काही वेळाने शुभम शिवलकर हे स्वतः देवरुखला जात असताना त्यांनी ती दुचाकी तिथे नजरेस न पडल्याने परिसरात शोध घेतला. मात्र गाडी कुठेही आढळली नाही. दुचाकीचा कोणीतरी अज्ञात इसमाने फायद्याच्या हेतूने लबाडीने नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी गु.र.नं. ८८/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.