(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठ ही रत्नागिरी जिल्ह्याच्या बॉर्डरवरील शेवटची बाजारपेठ असून, या बाजारपेठेतील बसस्टँडपासूनचे अवघे १०० ते १५० मीटर अंतरावरील रस्त्याचे रूपांतर आज नांगरणी स्पर्धेच्या मैदानात झाल्याची स्थिती निर्माण झालीं आहे..यामुळे या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
साखरपा मोठी बाजारपेठ असल्याने पूर्वीपासूनच महत्त्वाची ठरली आहे. रस्त्यालगत बँक ऑफ इंडियाची शाखा असून, जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्यामुळे कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस याच मार्गाने जातात. तसेच साखरपा पोलीस स्टेशनदेखील या रस्त्यालगत असल्याने, अनेक गावांतील जनता कामानिमित्त या मार्गाने प्रवास करत असते. मात्र, सध्या या रस्त्याने चालणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते.
कधी चिखलात पाय बुडतो, तर कधी खड्ड्यात. कधी चप्पल चिखलाने माखते, तर कधी वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे अंगावर चिखल उडतो. परिणामी कपडे चिखलाच्या रंगपंचमीने माखले जातात आणि अशा अवस्थेत कुठल्याही कामासाठी जाणे अवघड होते. याकडे कोणतेही लक्ष दिले जात नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रित खडी टाकण्यात आली होती, मात्र ती माती झाल्याने रस्त्याचे रूपांतर पुन्हा नांगरणी स्पर्धेच्या मैदानात झाले आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.
साखरपा भागात सर्वच पक्षांचे नेते सतत वावरत असतात, मात्र या रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष देऊ शकत नाही का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. या कामाचे श्रेय कोण घ्यायचे यावरूनच रस्त्याचे काम रखडले असल्याचे बोलले जात आहे.
“रस्त्याचे काम करून श्रेय घ्या, पण आम्हाला चिखलापासून वाचवा,” अशी मागणी बाजारपेठेतील व्यापारी, जनता, रिक्षाचालक व वाहनचालक करत आहेत. तसेच, आपापसातील वादातून रस्त्याची कामे अडवू नका. गणपतीपूर्वी रस्त्याचे खड्डे बुजवले नाहीत, तर आम्ही या मार्गावरच रस्ता रोको करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.