(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा क्रमांक १, जी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत १८५१ साली स्थापन झाली, ती शाळा यंदा १७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ५ ऑगस्ट २०२५ पासून शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाला भव्य प्रारंभ होणार आहे.
या महोत्सवानिमित्त शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, शाळा व्यवस्थापन समिती व शतकोत्तर अमृत महोत्सव समितीने संयुक्तपणे याचे आयोजन केले आहे.
इतिहास, गौरव आणि परंपरा…
मालगुंड येथील ही शाळा महाराष्ट्रातील अत्यंत जुन्या शाळांपैकी एक मानली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झालेल्या आणि आजही दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या शाळेने शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून कार्यरत आहेत—कोणी शासकीय सेवेत, कोणी उद्योग-व्यवसायात, तर कोणी शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले आहेत.
उत्साह, सहभाग आणि योगदान
माजी विद्यार्थ्यांचा सहभाग हा या महोत्सवाची खासियत ठरणार आहे. १९६० पासूनच्या तसेच अलीकडच्या काळातील माजी विद्यार्थी एकत्र येत असून, नियोजनात सक्रिय सहभागी होत आहेत. शाळेच्या जागेत बहुउपयोगी सभागृह उभारण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. याशिवाय, शासकीय पातळीवरून निधी मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
स्पर्धा आणि उपक्रमांचा भरगच्च कार्यक्रम
महोत्सवाच्या कालावधीत वृक्षारोपण, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, संविधान पाठांतर, समूहगीत, देशभक्तीपर गीतगायन, क्रीडा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेला शाळेचे माजी विद्यार्थी सुनिल मयेकर, गिरीश बापट, गजानन पाटील, विलास राणे, श्रीकांत मेहेंदळे, डॉ. संतोष केळकर तसेच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्य व परराज्यात स्थायिक असलेल्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
श्रीकांत मेहेंदळे (अध्यक्ष, महोत्सव समिती): ९४०३५०७९०५
सौ. प्रिया शिर्के (मुख्याध्यापिका): ९४०३९३६३४६
गिरीश बापट (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती)