(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे सोमवारी (दि. २८ जुलै) दरवर्षीप्रमाणे गणपती एक्का उत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. पहिल्या श्रावण सोमवारी आणि श्रावणी विनायक चतुर्थी निमित्त, श्रींच्या स्वयंभू गणपती मंदिरात सकाळी नऊ वाजल्यापासून ते आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजेपर्यंत सलग २४ तास हा सोहळा पार पडला.
या उत्सवात गणपतीपुळे व भंडारपुळे गावातील ग्रामस्थांनी एकत्रित सहभाग नोंदवून हरिनामाचा अखंड गजर घुमला. स्थानिक भजनी मंडळांनी सादर केलेल्या अभंग, भजन व कीर्तनांमुळे मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.
सहभागी भजनी मंडळे:
- गणपतीपुळे येथील केदारवाडी व मानेवाडी भजन मंडळ
- भंडारपुळे येथील धनजी समाज, बापूजी समाज, पाटील समाज
- वीरवाडी भजन मंडळ
यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या विविध भागातील भाविक व पर्यटकांनी देखील भजन-कीर्तनात सहभागी होऊन श्रद्धेने हरिनामाचा गजर केला. उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे पंच कमिटी, सर्व पुजारी, तसेच देवस्थानच्या कर्मचारीवर्गाचे विशेष सहकार्य लाभले. गावोगावीच्या भजनांच्या ओवींनी व हरिनामाच्या घोषांनी सजलेला हा गणपती एक्का उत्सव भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.