(संगमेश्वर / एजाज पटेल)
गोवा येथून मुंबईकडे जात असलेल्या आयशर टेम्पोचा आज सकाळी सुमारे ९ वाजता फुणगूस येथे अवघड वळणावर अपघात झाला. सुदैवाने चालकाने वेळेवर गाडीतून उडी मारल्याने जीवितहानी टळली. मात्र, टेम्पोतील कॅमिकल भरलेले बॅलर डोंगर उतारावरून गडगडत घनदाट जंगलात गेले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
गुगल मॅप ठरले ‘घातक’
महामार्गावरील निवळी फाट्याजवळ पोहोचल्यावर चालक योगेश गिरी गोस्वामी याने पुढील मार्गासाठी गुगल मॅपचा आधार घेतला. मॅपने त्याला फुणगूस-उक्षी मार्ग जवळचा असल्याचे दाखवले. मात्र हा मार्ग अवघड चढ-उतार आणि तीव्र वळणांनी भरलेला आहे. त्यामुळे त्याने जाकादेवी–फुणगूस हा पर्यायी मुख्य मार्ग निवडला. परंतु फुणगूस येथे आल्यावर एका तीव्र वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो कलंडला.
अपघाताच्या वेळी चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीव वाचला. परंतु, कॅमिकलने भरलेले काही मोठे बॅलर रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगर उतारावरून गडगडत जंगलात गेले. हे बॅलर बाहेर काढणे आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
गुगल मॅपवर अवलंबून राहण्याचे धोके
गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले. अलीकडेच अशाच एका घटनेत, एका महिला चालकाची कार मॅपच्या दिशादर्शनामुळे थेट पुलावरून नदीत कोसळली होती. नशिबाने ती महिला बचावली होती.
अनेक वाहन चालकांचे म्हणणे आहे की, “गुगल मॅपवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच अपघाताला आमंत्रण देणे.” फुणगूस परिसरातील अवघड वळणांमुळे वाहतुकीसाठी प्रशासनाने सुरक्षित पर्यायी मार्गांवर भर द्यावा, अशी मागणी केली जात आहे.