(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गाणसूरवाडी नदीवरील पूल सध्या कोसळण्याच्या उंबरठ्यावर असून, मोठ्या धोक्यामुळे या मार्गावरील एस.टी. बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून बांधलेला हा पूल अवघा एकच पावसाळा टिकला. जून २०२५ मधील जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या प्रचंड पुराने पुलाचा उजवा पाया धोकादायकरीत्या उखडला. त्याखालील पंजा वाहून गेल्याने अर्धा पाया हवेत लटकलेला आहे. या पायासह पूल कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या पुलावरून कायम रहदारी होत असल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाहतुकीचा पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांची चौकशीची मागणी
“अवघ्या दीड वर्षांपूर्वी बांधलेला पूल इतक्या लवकर धोकादायक कसा झाला?” असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची व बांधकामाला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.