(देवरुख / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक देवरूख येथील मराठा भवन येथे उत्साहात संपन्न झाली. या आढावा बैठकीला राज्य उपाध्यक्षा नलिनी भुवड, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, उपाध्यक्ष मिलिंद किर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुयोग कदम, महिला जिल्हाध्यक्ष आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करताना जिल्हात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणूनच लढविल्या जातील हे स्पष्ट करून जिल्हात आपली ताकद वाढली आहे हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलेले आहे. तेव्हा जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटीत प्रयत्न केले गेले पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील राहून काम निष्ठेने काम करून पक्षाला तळागाळात पर्यंत पोहचविण्यासाठी झोकून देत काम करावे असे आवाहन राज्य उपाध्यक्षा व जेष्ठ नेत्या नलिनी भुवड यांनी केले.
पक्षाचे काम करताना पक्षातून कोण जातोय, कोण येतोय याकडे दुर्लक्ष करून त्यामुळे विचलित न होता जनतेच्या संपर्कात राहून पदाधिकारी व कार्यकर्तेंनी आपापल्या भागातील गाव, वाडीवस्तींसह प्रभागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बने यांनी केले. या बैठकीत अनेक पदाधिकारऱ्यासह सर्वांनी पक्षासाठी दीलेले योगदान व पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा लेखाजोखा घेतला मांडला.
बैठकीच्या सुरुवातीला खेड येथील जेष्ठ नेते हरीभाई बुटाला
यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नुतन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले शशिकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. या बैठकीला जिल्हातील पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

