(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिर श्रावण महिन्यात ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत आहे. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला असून, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवार मंदिरात भक्तीचा उत्सव रंगत आहे.
कोकणातील जागृत देवस्थानांपैकी एक असलेले श्री देव रामेश्वर मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले असून, येथील स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूरदूरहून येथे दाखल होत आहेत. श्रावणातील चारही सोमवार तसेच शनिवारी सकाळपासून मंदिरात भाविकांची मोठी रांग लागते.
प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक आणि शनिवारी विशेष पूजाविधी होतात. दररोजच्या सकाळ-संध्याकाळच्या आरत्या व ‘ॐ नमः शिवाय’च्या जपामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो.
त्रिदेव रामेश्वराचे धार्मिक महत्त्व
गावखडीतील त्रिदेव रामेश्वर हे दक्षिण कोकणातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ मानले जाते. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक कुटुंबांचा हा कुलदैवत आहे. नवागत भाविक सुद्धा मंदिराच्या पवित्र वातावरणाने भारावून जातात. मंदिर परिसरात पाऊल ठेवताच भक्तिभाव जागृत होतो, असे अनेकांचे अनुभव आहेत.
श्रावण महिन्यात विशेषतः नवसाला पावणारा म्हणून ओळख असलेल्या श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागलेली असते. “आम्हाला सर्वांना सुखी ठेव” अशी प्रार्थना करीत भाविक भगवान शंकराच्या चरणी आपली मनीषा व्यक्त करतात. ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने व भक्तीमय वातावरणाने गावखडीचे हे पवित्र शिवस्थान सध्या विशेष उत्साही दिसून येत आहे.
फोटो : गावखडीतील जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर
(छायाचित्रकार : दिनेश पेटकर, गावखडी)