(संगमेश्वर)
संगमेश्वर–पिरंदवणे मार्गावरील एस.टी. बसची वेळ बदलण्याची ग्रामस्थांची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. आता ही बस संगमेश्वर येथून संध्याकाळी ५ वाजता सुटणार असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात पिरंदवणे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गमरे यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसह देवरुख आगारप्रमुख मधाळे यांची भेट घेतली. बसची वेळ विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी वेळेत बदल करण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आगारप्रमुख मधाळे यांनी तातडीने दखल घेत नवीन वेळ निश्चित केली.
पूर्वी ही बस अन्य मार्गे (व्हाया) जात असल्याने पिरंदवणेतील विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली होती. या नव्या वेळेच्या मागणीसाठी प्रकाश गमरे, गणेश आंग्रे, गोविंद धोपट, संतोष माने, हरेश लिगावळे, यशवंत जांभळे, रवींद्र काजरेकर तसेच महिला पालकांनी आगार कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली.
ग्रामस्थांनी बसची वेळ सुधारण्यासाठी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल आगारव्यवस्थापक मधाळे यांचे आभार मानले आहेत.

