(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक गटांमध्ये चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या असून, कोसुंब गटातील सामना सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. ‘हाय व्होल्टेज’ ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आता आज होणाऱ्या निकालाकडे लागून राहिली आहे.
तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर गटात उद्धवसेनेकडून सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सुशील भायजे, वंचित बहुजन आघाडीकडून अजित कांबळे तर अपक्ष म्हणून जगन्नाथ राऊत यांच्यात चौरंगी लढत होत आहे. कडवई गटात उद्धवसेनेचे संतोष थेराडे, भाजपचे विनोद म्हस्के आणि काँग्रेसचे आशिष सुर्वे यांच्यात सरळ तिरंगी सामना रंगला आहे. कसबा गटात उद्धवसेनेच्या विशाखा कुवळेकर आणि शिंदेसेनेच्या रचना महाडिक यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेल्या रचना महाडिक यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मुचरी गटात शिंदेसेनेच्या माधवी गीते, उद्धवसेनेच्या ललिता तांबे आणि अपक्ष नुपुरा मुळ्ये यांच्यातही अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्यासमोर मित्रपक्षाचाच उमेदवार उभा ठाकल्याने त्यांची कसोटी लागली आहे. कोसुंब गटात भाजपचे प्रमोद अधटराव, उद्धवसेनेचे जनक जागुष्टे, शिंदेसेनेचे रोहन बने आणि काँग्रेसचे चंद्रकांत मोरे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. युती म्हणून निवडणूक लढली जात असतानाच भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने युतीत फूट पडली असून, त्यामुळे येथील सामना अधिकच रंगतदार बनला आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये बने आणि अधटराव यांच्यात झालेल्या कडव्या लढतीची पुनरावृत्ती यंदा पुन्हा पाहायला मिळत आहे. साडवली गटात भाजपच्या रुपाली कदम आणि उद्धवसेनेच्या नेहा माने यांच्यात तर दाभोळे गटात विलास चाळके आणि वंचित बहुजन आघाडीच्या वीरश्री बेटकर यांच्यात लढत होत आहे.
५३.८५ टक्के मतदान
संगमेश्वर तालुक्यात एकूण १ लाख ५९ हजार ७१३ मतदार असून, त्यापैकी ८६ हजार २ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४२ हजार १०० पुरुष आणि ४३ हजार ९०२ महिला मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तालुक्यात ५३.८५ टक्के इतके मतदान नोंदवले गेले.
एकूणच, संगमेश्वर तालुक्यातील ही निवडणूक अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरली असून, निकालातूनच खरी राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत.

