(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाटद एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांविरोधात पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाकडे जे काही पुरावे असतील, ते जाहीर करा; म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे थेट आव्हान वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गवाणकर यांनी दिले आहे. खंडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या एमआयडीसी समर्थन सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीविरोधकांवर केलेल्या आरोपांना गवाणकर यांनी ठाम प्रत्युत्तर दिले.
हा संघर्ष पालकमंत्र्यांविरोधात नाही, तर त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या दलालांविरोधात आहे,” असे स्पष्ट करत गवाणकर म्हणाले की, “या दलालांनी सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन त्यातून फायदा मिळवण्याचे षड्यंत्र रचले आहे. काही जण तर खोटी खरेदीखते तयार करून जेलवारी करून आलेले आहेत.
प्रथमेश गवाणकर यांनी दावा केला की, शनिवारी झालेल्या समर्थन सभेसाठी स्थानिकांचा सहभाग कमी असल्यामुळे वरवडे, जयगड, सैतवडे आणि जांभारी गावांमधून लोकांना आणण्यात आले. “प्रामाणिक जनतेने त्या आमिषांना बळी न पडता घराबाहेर पडणे टाळले. खरा विरोध किती आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर पत्रकारांनी या सहा गावांतील घराघरात जाऊन सर्व्हे करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

