( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुक्यातील तुरळमधील डिकेवाडी येथील प्राथमिक शाळेत सहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून यशस्वीपणे कार्यरत असलेल्या सौ. सुलभा संदेश कदम यांची नुकतीच कडवई तांबडवाडी येथे बदली झाली. त्यांच्या बदलीनिमित्त गावकऱ्यांनी, शाळा व्यवस्थापन समितीने आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
आपल्या कार्यकाळात कदम मॅडम यांनी शाळेचा शैक्षणिक व भौतिक विकास साधला. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, स्वच्छता मोहिमा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी शाळेला नवे रूप दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले.
कदम मॅडम केवळ शिक्षक नव्हत्या, तर आमच्या मुलांना आयुष्यात एक उत्तम माणूस बनून समाजाला व देशाला पुढे नेण्याचे धडे देणाऱ्या मार्गदर्शक होत्या. त्यांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा आम्हाला कायम स्मरणात राहील, असे गावकऱ्यांनी गौरवोद्गार काढले. या निरोप समारंभाला पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग उपस्थित होता. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

