( रत्नागिरी )
रत्नागिरी पोलिसांचा विश्वासू आणि धाडसी साथीदार असलेला पोलीस श्वान ‘विराट’ याचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. एका कर्तबगार सहकाऱ्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण रत्नागिरी पोलीस दलात शोककळा पसरली. त्याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉबरमन जातीचा असलेला विराट २०१७ साली रत्नागिरी पोलीस दलात दाखल झाला होता. गेल्या नऊ वर्षांच्या सेवाकाळात त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या आणि चपळाईच्या जोरावर अनेक गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना महत्त्वाची मदत केली. त्याच्या साहाय्याने २ खून, १ अपहरण आणि १० चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले.
वासावरून गुन्ह्याचे धागेदोरे शोधून काढण्यात विराटचा विशेष हातखंडा होता. त्यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळत असे आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मोठी मदत होत असे.
या विश्वासू साथीदाराच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या बॉम्ब शोध व नाश पथकाच्या कार्यालयाच्या आवारात त्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक शेगाबेन मावची, पोलीस उपनिरीक्षक किरण घाग तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या या लाडक्या आणि विश्वासू सहकाऱ्याला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

