(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, खेड पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील दोन तरुणांना गांजा विक्री करताना रंगेहात पकडले. भोस्ते येथील जगबुडी नदीवरील पुलापासून देवना पुलाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर सोमवारी (३ ऑगस्ट) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ हजार ७२ ग्रॅम सुकलेला गांजा, दोन ५जी स्मार्टफोन आणि टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी असा एकूण १ लाख ९७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी इरफान इद्रीस खान (१९, रा. मुस्लिम मोहल्ला, आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) आणि मोहम्मद साद साजिद शहा (१८ वर्षे ११ महिने, रा. दखनी मोहल्ला, कसबा, ता. संगमेश्वर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरोधात अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगबुडी नदीकाठच्या निर्जन रस्त्यावर सापळा
पोलिसांना गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर जगबुडी नदीकाठच्या निर्जन मार्गावर सापळा रचण्यात आला. संशयित तरुण गांजा विक्रीसाठी आले असताना पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ हजार ९७२ रुपये किमतीचा १ हजार ७२ ग्रॅम सुकलेला गांजा मिळून आला. याशिवाय दोन मोबाईल फोन आणि गांजा वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे सांगितलेली टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे खेड पोलिसांचे कौतुक होत असतानाच, अंमली पदार्थांच्या पुरवठ्याची मूळ साखळी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
‘मोठ्या माशां’पर्यंत तपास पोहोचणार का?
अवघ्या १८ ते १९ वर्षांच्या तरुणांचा गांजा विक्रीच्या प्रकरणात सहभाग समोर आल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. संगमेश्वर आणि परिसरातील तरुणांपर्यंत गांजाचा पुरवठा नेमका कुठून होतो? हा गांजा कोणामार्फत आणला जातो? या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केवळ गांजा विक्री करताना पकडलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता पुरवठादार, साठवणूकदार आणि या साखळीमागील मुख्य सूत्रधारापर्यंत तपास पोहोचवणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून अंमली पदार्थांच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळी उघड करण्याचे आव्हान खेड पोलिसांसमोर आहे.
तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी अशा कारवाया सातत्याने होणे आणि या अवैध व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

