(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर पसरलेली खडी, खड्डे आणि उखडलेला पृष्ठभाग यामुळे नागरिकांचा प्रवास अक्षरशः जीवावर उठला आहे. कालच डिलिव्हरी बॉयची दुचाकी या खडीवर घसरून अपघाताचा बळी ठरण्याचा प्रसंग थोडक्यात टळला. सुदैवाने मागून कोणतेही वाहन न आल्याने अनर्थ टाळला; पण प्रश्न असा निर्माण होत आहे की, एवढा मोठा धोका परिस्थितीत महामार्ग प्राधिकरण विभाग आणि ठेकेदार कंपनी नेमकी गाढ झोपेत कशी?
रस्त्यांची जबाबदारी रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीकडे असली तरी या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाच्या बेफिकीर भूमिकेवर आता स्थानिक संताप व्यक्त करत आहेत. कामांचे मानांकन, गुणवत्ता तपासणी, दैनंदिन निरीक्षण, नागरिकांच्या तक्रारी यातील कोणतेही काम नियमानुसार होताना दिसत नाही. प्राधिकरणाच्या निष्क्रियतेमुळे ठेकेदाराला मनमानीची मुभाच मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
धूळ नियंत्रणासाठी रस्त्यांवर पाणी मारले जात असले तरीही त्यातून खड्ड्यांतून दुचाकीवरून प्रवास करावा म्हणजे एखाद्या अपघाताला सामोरे जावे अशीच शक्यता निर्माण होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदाराला दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे उघड दिसत असतानाही जबाबदारीची चौकशी मात्र कुणी करताना दिसत नाही. स्थानिक आरोग्य केंद्रात पाठदुखी, कंबरदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यांवरील धक्के आणि विषम पृष्ठभाग हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. आजारांचे ओझे आम्ही वाहायचं, आणि प्राधिकरणाने फक्त कागदावरील टक्केवारीमध्येच काम पूर्ण दाखवायचं का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांच्या समस्या, अपघाताचे धोके आणि नागरिकांमधील नाराजी सातत्याने वाढत असतानाही महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कृती होत नाही. उलट काम सुरू झाले की त्रास वाढतो आणि काँक्रिट मार्गिका तयार करून एक महिना पूर्ण व्हायच्या आधीच रस्त्यांना भेगा पडताना दिसून येतात. नियमांचे उल्लंघन, निकृष्ट दर्जाची कामे, वाढते अपघात… याबाबत ठेकेदारावर कारवाई करणार की प्राधिकरणाचा मौनच कायम ठेवणार? असा थेट सवाल अधिक तीव्र होत आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे मिऱ्या –नागपूर महामार्ग आज नागरिकांच्या असुरक्षिततेचे प्रतीक बनला आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागासह स्थानिक आमदार तथा पालकमंत्र्यांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे, अन्यथा आधीच रस्त्यांनी धुळीने हैराण झालेल्या वाहनचालक, प्रवासी यांना येत्या काळात एखादा मोठा जीवितहानीचा मोठा प्रसंग अटळ ठरू शकतो.

