(रत्नागिरी / वार्ताहर)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी तालुका कार्यालय व युवासेनेच्या वतीने आदर्श हायस्कूल, कुरतडे येथे चित्रकला आणि हस्तकला (मातीकाम) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, तालुकाप्रमुख संदेश नारगुडे, युवासेना कार्यकर्ते विजय जाधव आणि सार्थक आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
चित्रकला स्पर्धेतील विजेते :
चित्रकला स्पर्धेत प्रांजल शरद फुटक (इयत्ता ९ वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. मानवी महेश पवार (इयत्ता ८ वी) हिने द्वितीय, तर अनुष्का अविनाश फुटक (इयत्ता १० वी) हिने तृतीय क्रमांक मिळवला. प्रज्वल प्रकाश बिर्जे (इयत्ता ८ वी) याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
हस्तकला (मातीकाम) स्पर्धेतील विजेते :
हस्तकला स्पर्धेत आयुष पांडुरंग करसोडे (इयत्ता १० वी) याने प्रथम क्रमांक मिळवला. वेदिका निलेश साळवी (इयत्ता १० वी) हिने द्वितीय, तर नंदिनी महेश पालवकर (इयत्ता १० वी) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याची गरज
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा युवासेनेचा उद्देश असल्याचे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मांडवकर यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात प्रतिभेची कमतरता नसून, विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी योग्य संधी आणि व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्याध्यापकांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना प्रसाद सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तळागाळातील तसेच दुर्गम भागातील शाळांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त केला. युवासेना केवळ स्पर्धांच्या आयोजनापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती आणि त्यांच्या उत्साहाचे उपस्थितांनी कौतुक केले. युवासेनेच्या या उपक्रमाचेही उपस्थितांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

