(संगमेश्वर / प्रतिनिधी )
‘संगमेश्वर संपदा’ या संवाद मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ‘कलांगण संगमेश्वर’ तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही इ. ८वी ते १०वी तील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून गुरुवार दि. ३१ जुलै रोजी बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास रोख रु. २००० आणि सन्मानचिन्ह, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांस अनुक्रमे रोख रु. १५०० व १००० त्याचसोबत पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याच्या मार्गदर्शक शिक्षकास रोख रु. १००० आणि प्रशस्तीपत्र तसेच सर्व सहभागी, विजेत्या स्पर्धकांना देखील प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
यावर्षी स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील एकूण १५ शाळांतील २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये सर्व विद्यार्थिनींचा समावेश आहे ही विशेष बाब म्हणायला हवी. स्पर्धेसाठी A. I तंत्रज्ञान – अपरिहार्यता आणि परिणाम, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन – समस्या आणि संधी, काकोरी बंड आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, ज्ञानदेवे रचिला पाया असे ४ विषय विद्यार्थ्यांना देण्यात आहे आहेत.
गुरूवारी सकाळी ९ वाजता शाळेच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ होईल तरी या स्पर्धेसाठी सर्व सुजाण, जाणकार श्रोत्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन स्पर्धेच्या समन्वयक सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सौ. संपदा जोगळेकर-कुलकर्णी आणि कलांगणचे अध्यक्ष अमोल लोध यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.