(गणपतीपुळे / वैभव पवार)
“तथागत भगवान गौतम बुद्धांनी अखंड मानवजातीसाठी दिलेला धम्म हा दुःखातून मुक्त करणारा आणि अंधश्रद्धेपासून दूर ठेवणारा आहे. म्हणूनच, मानवी जीवनात बौद्ध धम्माचे सर्वांगीण आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन बौद्धाचार्य करुणा प्रमोद पवार यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील ‘धम्मचेतना बुद्ध विहार’ येथे रविवारी (दि. २० जुलै) वर्षावास या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समितीच्या अखत्यारित असलेल्या संस्कार समितीच्या वतीने बौद्धाचार्य करुणा पवार यांनी प्रमुख प्रवचनकार म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या साध्या, सोप्या आणि प्रभावी भाषेत बोलताना त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म कसा सर्वकल्याणकारी आहे, याचे विवेचन केले. “धम्म आचरणामुळे माणूस केवळ वैयक्तिक उन्नतीच नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक स्थैर्य प्राप्त करू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
धार्मिक प्रबोधनातून समाजजागृती
सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेकजण अंधश्रद्धेत अडकले असून, यावर बौद्ध धम्मच खऱ्या अर्थाने उपाय आहे, असे सांगत करुणा पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म मार्गावर प्रत्येकाने चालण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, संस्कार समिती रत्नागिरी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ मालगुंड, बौद्ध ग्रामस्थ मंडळ (स्थानिक व मुंबई) आणि आदर्श महिला मंडळ मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालगुंड शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष भारत पवार, मुंबई बौद्ध ग्रामस्थ मंडळाचे चिटणीस प्रमोद पवार, बावीस खेडी बौद्धजन संघाचे सभापती रजत पवार, रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, तालुका महिला मंडळ उपाध्यक्षा रितिका जाधव, चिटणीस दिया कांबळे, प्रज्ञा पवार, शिल्पा पवार, शर्मिला पवार, प्राजक्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
धम्म चेतना बुद्ध विहारात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना गंध व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर दिवंगत सदस्यांना सामूहिक मूक श्रद्धांजली वाहण्यात आली. बुद्ध वंदना रत्नागिरी संस्कार समितीचे बौद्धाचार्य सुहास कांबळे आणि वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
सांस्कृतिक सादरीकरणाने रंगत
मालगुंड शाखेचे चिटणीस श्याम पवार आणि त्यांच्या बालकलाकार समूहाने सादर केलेल्या धम्मगीत व स्वागतगीत यामुळे कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी झाले. यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष प्रकाश पवार यांनी आपल्या मनोगतातून शाखेच्या उपक्रमांची माहिती देत बौद्धजन पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोपात अध्यक्ष रविकांत पवार यांनी प्रवचनकार करुणा पवार यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचे कौतुक करत, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, ग्राम शाखा प्रतिनिधी, बौद्ध ग्रामस्थ मंडळ मुंबई व स्थानिक समिती, तसेच आदर्श महिला मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या अखेरीस श्याम पवार व त्यांच्या बालकलाकार समूहाने वर्षावासावर आधारित गीत सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. सूत्रसंचालन श्याम पवार यांनी, तर आभार प्रदर्शन उपसचिव मयुरेश पवार यांनी केले. ‘सरणत्तय गाथा’ सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मालगुंड शाखेचे सर्व पदाधिकारी, बौद्ध ग्रामस्थ मंडळ (मुंबई व स्थानिक), आदर्श महिला मंडळाच्या महिला भगिनी आणि धम्म अनुयायांनी विशेष मेहनत घेतली.