मासिक महासत्संग व शिवलिंगार्चन सोहळा उत्साहात
नाशिक (प्रतिनिधी): समस्त सेवेकरी परिवाराने व्रतवैकल्यांच्या श्रावण मासात राष्ट्र, समाज आणि जनहितासाठी भगवान शिवाची जास्तीत जास्त शक्तिशाली सेवा समर्पित करावी असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी भोले सांब आणि स्वामीनामाचा एकच जयजयकार करून आसमंत दणाणून सोडला.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात शनिवारी (२६ जुलै) मासिक महासत्संग अपूर्व उत्साहात पार पडला.देश विदेशातून सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवेकऱ्यांना संबोधित करताना गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की, देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग एकमेव महाराष्ट्रात असल्यामुळे आपण सारे खूप भाग्यवान आहोत. त्यामुळे श्रावण मासात महाराष्ट्रातील प्रत्येक ज्योतिर्लिंगावर जाऊन सेवेकर्यांनी मानसन्मान करावा आणि रुद्र सेवा श्रींच्या चरणी समर्पित करावी, त्याचप्रमाणे राष्ट्रहितासाठी सर्व केंद्रांमध्ये सेवेकऱ्यांनी मनोभावे शिवाची सेवा रुजू करावी. ही सेवा इतकी शक्तिशाली आहे की त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वर्षभर पुरेल आणि शिल्लकही राहील.या ऊर्जेतून जनहिताची कामे करावयाची आहेत अशा शब्दात गुरुमाऊलींनी भगवान शिवाच्या सेवेचे माहात्म्य नमूद केले.
ऑक्टोबरमध्ये गाणगापूरला दत्तसेवा
श्री क्षेत्र गाणगापूरला ऑक्टोबरच्या चौथ्या शनिवारी मासिक महासत्संग आणि त्यानिमित्ताने एका तासात होणारी दत्तकवच ही सेवा घेण्यात येईल अशी घोषणा गुरुमाऊली श्री. मोरे यांनी केली तेव्हा सेवेकर्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी पिठापूरलाही कार्यक्रमाचे नियोजन राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या हितगुजात गुरुमाऊलींनी मूल्य संस्कार, विवाह संस्कार, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, पर्यावरण, मराठी अस्मिता व भारतीय संस्कृती, कृषी आदी समाजोपयोगी विभागांचे महत्त्व स्पष्ट केले. सेवानिवृत्त मंडळींनी मूल्यसंस्कार विभागाचे कार्य हाती घ्यावे आणि विवाहाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गावागावात विवाह मंडळे उभारावीत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे, ज्येष्ठ सेवेकरी सतीश मोटे हेही उपस्थित होते.
श्रावण मासानिमित्त शिवलिंगार्चन सेवा…
श्रावण मासानिमित्त मासिक महासत्संगाच्या पर्वावर गुरुपीठात राष्ट्र कल्याणासाठी श्री शिवलिंगार्चन सेवा घेण्यात आली. ज्येष्ठ याज्ञिकी दीपक शास्त्री मुळे यांनी पौरोहित्य केले. सकाळी भूपाळी आरतीनंतर ही सेवा पार पडली. परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजानंतर दर्शन आणि पालखी सोहळाही उत्साहात संपन्न झाला.