(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २७ जुलै रोजी अनुस्कुरा घाट आणि पांडवकालीन ऐतिहासिक उगवाई मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत वड, पिंपळ, आंबा, काजू यांसारख्या भारतीय संस्कृतीशी नाते असलेल्या, दीर्घायुषी व फलद्रूप वृक्षांची लागवड घाट परिसरात, तर उगवाई मंदिर परिसरात फुलझाडांची लागवड केली जाणार आहे.
कार्यक्रमास जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बावधनकर, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष लाड, श्री. गणेश चव्हाण, वृक्षमित्र श्री. अमर खामकर, तळवडेच्या सरपंच सौ. गायत्री साळवी, पर्यटन अभ्यासक श्री. विजय हटकर, कवी श्री. विराज चव्हाण, श्री. दीपक आयरे, पत्रकार श्री. उमेश दळवी, श्री. जयेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कानसे, आदर्श शिक्षक दीपक नागवेकर, श्री. सुनील कदम, येरडवच्या सरपंच सौ. विद्या बामणे, श्री. गणेश सुतार, श्री. राजू पत्की, पाचलचे माजी उपसरपंच श्री. किशोर नारकर, श्री. चंद्रहास नारकर, तसेच खापणे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील आणि स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना अध्यक्ष सुभाष लाड म्हणाले, “युनेस्कोमार्फत चौदा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहेच, मात्र सातवाहनकालीन या ऐतिहासिक पायवाटेची दुरुस्ती शासनाने तातडीने करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिक संघाच्या वतीने पुढील काळात प्रयत्न केले जातील.”
या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

