(खोपोली)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटातील दत्ता फूड मॉलसमोर शनिवारी दुपारी भीषण साखळी अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या या दुर्घटनेत १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० ते २२ जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून, अपघातग्रस्तांवर तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर घडली. सखल उतारावर कंटेनरचा चालक वाहनावरील ताबा गमावल्याने समोरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की अनेक गाड्या अक्षरशः चिरडल्या गेल्या. यामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस व ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी वेगाने सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावर जवळपास ५ किलोमीटरपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातग्रस्त वाहने महामार्गावर अडथळा ठरल्याने इतर वाहनांना पुढे जाणे अशक्य झाले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती आणि परिसरात मोठी गर्दी जमली होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील सर्वाधिक वाहतुकीचा महामार्ग मानला जातो. दररोज सुमारे दीड ते दोन लाख वाहने या मार्गावरून प्रवास करतात. विकेंडला या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजन केले असले तरी, आजच्या अपघातामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली.
या अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.