(नवी दिल्ली)
देशातील एकूण बेरोजगारी दर जून महिन्यात ५.६ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकतेच जाहीर केलेल्या मासिक कामगार दल सर्वेक्षणानुसार (पीएलएफएस) मे महिन्याप्रमाणेच जूनमध्येही बेरोजगारी दरात फारसा बदल झालेला नाही. एप्रिल महिन्याच्या तुलनेत (५.१ टक्के), जूनमध्ये हा दर किंचित वाढलेला दिसतो.
गेल्या महिन्यात महिलांच्या बेरोजगारी दरात किंचित घट झाली असून, मे महिन्यातील ५.८ टक्क्यांच्या तुलनेत जूनमध्ये तो ५.६ टक्क्यांवर आला आहे. यामागे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. मात्र, १५ ते २९ वयोगटातील युवांमध्ये बेरोजगारीचा दर वाढत असून तो जूनमध्ये १५.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यात तो १५ टक्क्यांवर होता.
युवतींमध्ये बेरोजगारीचा दर मे महिन्यातील १६.३ टक्क्यांवरून वाढून जूनमध्ये १७.४ टक्क्यांवर गेला आहे. तर युवकांमध्ये तो १४.५ टक्क्यांवरून १४.७ टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे. ही वाढ चिंताजनक मानली जात असून, देशातील शिक्षित युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे चित्र उभे राहिले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागांतील बेरोजगारी दरातही स्पष्ट तफावत दिसून येते. जून महिन्यात शहरी भागात बेरोजगारीचा दर २५.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, जो मे महिन्यात २४.४ टक्के होता. त्याउलट, ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर जूनमध्ये १३.७ टक्क्यांवर आहे, जो मे महिन्यात १३ टक्क्यांवर होता.
या आकडेवारीवरून देशातील बेरोजगारी ही अजूनही एक मोठी समस्या आहे, हे स्पष्ट होते. विशेषतः युवांमध्ये वाढणाऱ्या बेरोजगारीमुळे शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, रोजगारनिर्मितीसाठी अधिक ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.