(मुंबई)
महाराष्ट्रातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) २०२६–२७ शैक्षणिक वर्षासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी MHT CET 2026 प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि ॲग्रीकल्चरल एज्युकेशन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MBA/MMS) या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश नोंदणी सुरू आहे.
नोंदणी आज १० जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक उमेदवार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
दोन संधींची परीक्षा:
विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळाव्या म्हणून यावर्षापासून MHT CET (PCM आणि PCB समूह) तसेच MBA/MMS परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार आहेत. PCM आणि PCB समूहासाठी प्रथम संधीची परीक्षा ११ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ आणि द्वितीय संधी १० मे ते १७ मे २०२६ दरम्यान होणार आहे. MBA/MMS साठी प्रथम संधीची परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ आणि द्वितीय संधी ९ मे २०२६ रोजी होईल. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना ठरवावे लागेल की ते एकदाच परीक्षा देणार आहेत की दोन्ही वेळा; दोन्ही वेळा परीक्षा दिल्यास जास्त गुण मिळालेली परीक्षा प्रवेशासाठी गृहीत धरली जाईल.
APAR आणि UDID नोंदणी अनिवार्य:
विद्यार्थ्यांची अचूक माहिती आणि पडताळणी सुनिश्चित करण्यासाठी यंदा MHT CET नोंदणीसाठी APAR (Automated Permanent Academic Record) आयडी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UDID (Unique Disability ID) अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप APAR आयडी तयार केलेला नाही, त्यांनी डिजीलॉकरद्वारे त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.
२०२५ मध्ये PCM समूहाची प्रवेश परीक्षा ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी, PCB समूहाची ३,०१,०७२ विद्यार्थ्यांनी आणि MBA/MMS १,१६,५८५ विद्यार्थ्यांनी दिली होती. MHT CET 2026 या सर्व अभ्यासक्रमांसाठी संगणकाधारित ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहेत.
या नवीन सुविधा आणि दोन वेळा परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतील आणि प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता व अचूकता सुनिश्चित होईल.

