(नांदेड)
अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन कॉलेज तरुणी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर त्यांच्या मित्रांसोबत दुचाकीवरून शहरातील एका लॉजवर गेल्या. यातील एका तरुणीच्या अल्पवयीन भावाला आपली बहिण लॉजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो दोन मित्रांसह तेथे पोहोचला. लॉजच्या एका खोलीत त्याने बहिणीला आणि तिच्या मित्राला रंगेहाथ पकडले, तिथे वादावादी झाली. या गोंधळात संबंधित तरुणीने घाबरून लॉजच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये तिचा हात फ्रॅक्चर झाला असून, तिच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विवादानंतर संबंधित तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांनी त्या तरुणाला लॉजबाहेर ओढत आणलं आणि भोकर फाट्याजवळ नेऊन मारहाण केली. यावेळी त्याच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर जखमी तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, कॉलेज सुटल्यानंतर मुख्य आरोपी आणि इतर दोघांनी आम्हा तिघींना जबरदस्तीने दुचाकीवर लॉजवर नेले आणि मुख्य आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात बलात्कार व अनुसूचित जाती-अजमात अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (ॲट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली.
दरम्यान, जखमी झालेल्या तरुणानेही तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अल्पवयीन भावासह इतर दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून संबंधित तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही बाजूंचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

