(मुंबई)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला दिलेल्या दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाज्याच्या आत ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता अनेकांना प्रश्न पडत आहेत की, एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला का गेले होते? तसेच अमित शाह आणि त्यांच्यात काय चर्चा झाली असावी? त्यातच शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिंदेंचा कार्यक्रम आधीच निश्चित होता. त्यांनी शहा यांच्या पायावर डोकं ठेवून चाफ्याची फुलं वाहिली आणि पायाला चंदन लावलं. त्यानंतर इतर नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदेंनी फडणवीसांविषयी तक्रारी करत आपली नाराजी व्यक्त केली,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
पुढे राऊत म्हणाले, “शिंदेंनी अमित शहा यांच्यासमोर एक मोठी ऑफर ठेवली – ‘मराठी माणसांची एकजूट तुटली तर आपल्याला धोका होईल. मी मुख्यमंत्री झालो, तर परिस्थिती हाताळता येईल. या सगळ्या गोष्टी मी थांबवू शकतो.’ यावर शहांनी स्पष्टपणे सांगितलं की, मुख्यमंत्रीपद भाजपचाच असेल.” विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं. आता त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागेल, असं शिंदेंना वाटतं. त्यामुळे त्यांनी भाजपला अशी ऑफर दिली, असंही संजय राऊत म्हणाले.
“गट भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी”
संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, “मुख्यमंत्रीपद दिल्यास मी माझ्यासह संपूर्ण गट भाजपमध्ये विलीन करायला तयार आहे,” अशी ऑफर शिंदेंनी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं. हा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने फाईल उघडण्यास सुरूवात केली असून, शिंदेंच्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शिंदेनी भाजपला अशी ऑफर दिली असल्याचं संजय राऊत पुढे म्हणाले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे किंवा भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सत्ताकारणात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशीही चर्चा आहे.

